मुंबई - येस बँकेचे संस्थापक राणा कपूर हे सध्या मनी लाँड्रिग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. पूर्वी असलेली वैद्यकीय स्थिती लक्षात घेता कोरोना होण्याचा धोका असल्याचे सांगत कपूर याने न्यायालयाकडे जामीन अर्ज केला आहे.
राणा कपूरच्यावतीने सुभाष जाधव यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. फुफ्फुस, सायनस आणि त्वचारोग यांचे संसर्ग असल्याचे कपूर यांनी अर्जात म्हटले आहे. तसेच रक्तदाब, चिंता आणि नैराश्य यांचा गेल्या १८ महिन्यांपासून त्रास आहे. तर बालपणापासून अस्थमा असल्याचे कपूर यांनी जामिन अर्जात म्हटले आहे. लहानपणापासून दमा असल्याने इनहेलरची आवश्यकता भासते. विविध फुफ्फुसाला होणाऱ्या संसर्गामुळे मृत्यू होवू शकतो. सध्याच्या कोरोनामुळेही फुफ्फुसाला संसर्ग होवू शकतो. कोरोनामुळे ६० वर्षांहून वयाच्या व्यक्तीला, कमी प्रतिकारक्षमता आणि श्वसानाचे रोग असलेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा अधिक धोका आहे. कोरोनाशी लढण्याकरता घरी राहणे गरजेचे असल्याचे कपूर यांनी जामिन अर्जात म्हटले आहे.