मुंबई- मुंबई मेट्रो -३ च्या कामाने आज महत्वाचा टप्पा गाठला आहे. मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील ३.८२ किमीच्या बोगद्याचे काम पूर्ण केल्याचे हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने (एचसीसी) जाहीर केले आहे. हा बोगदा दाट लोकसंख्या असलेल्या दक्षिण मुंबईमधून जातो.
बोगद्याचे काम हे आव्हानात्मक होते, अशी एचसीसीच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली आहे. हा बोगदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान आहे. मेट्रो -३ प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण करणारी एचसीसी ही पहिली कंपनी ठरली आहे.
असे करण्यात आले काम-
बोगद्यासाठी दररोज ८.२० मीटर खोदकाम करण्यात येत होते. हा बोगदा काळबादेवी, गिरगाव आणि ग्रँट रोडच्या स्टेशन बॉक्समधून जातो. या कामासाठी एचसीसीने चीनमधून टनेल बोअरिंग मशीन आणल्या आहेत. त्याची लांबी ११७ मीटर तर व्यास ६.६८ आहे. तर टनेल बोअरिंग मशीनचे वजन ६४८ टन आहे.
काही महिने कंपनीने भू-तांत्रिक तपासणी केल्यानंतर कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
प्रकल्पासाठी येणार २३ हजार १३६ कोटी रुपये -
मेट्रो -३ ची लाईन कुलाबा वांद्राला (अंधेरी पूर्व) जोडणारी आहे. हा मुंबईतील पहिला पूर्णपणे भूयारी मार्ग असणार आहे. त्यासाठी सुमारे २३ हजार १३६ कोटी रुपये खर्च येणार आहे. मेट्रो प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनकडून (जेआयसीए) १३ हजार ३२५ कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे.
असे करण्यात येणार काम-
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एचसीसीला जुलै २०१६ मध्ये कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटानुसार एचसीसीला संरचना आणि बोगद्याचे काम करावे लागणार आहे. यामध्ये टनेल बोरिंग मशिनने जुळे बोगदे तयार करावे लागणार आहेत. तर सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव आणि ग्रँट रोड येथे भूयारी मेट्रो स्टेशन करण्यात येणार आहेत.
कंपनीने बोगद्याचे वेळेवर काम पूर्ण केले. त्यानंतर एचसीसीकडून विशिष्ट संरचना असलेल्या भूयारी स्टेशनचे काम करण्यात येणार आहे.