नवी दिल्ली - हेल्मेट कंपनी स्टीलबर्ड हायटेक इंडियाने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची ऑफर दिली आहे. स्टीलबर्ड हायटेक इंडिया ही आशियामधील सर्वात मोठी हेल्मेट उत्पादक कंपनी आहे. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्टीलबर्ड कंपनीने ऑफर दिली आहे, हे विशेष !
स्टीलबर्ड कंपनीने जम्मू आणि काश्मीरचे ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. उत्पादन सुरू झाल्याने काश्मीर खोऱ्यात नवी औद्योगिक क्रांती होईल आणि नागरिकांना रोजगारांच्या संधी मिळण्यासाठी सहाय्य होईल, असे कंपनीने म्हटले आहे.
स्टीलबर्ड हेल्मेटचे चेअरमन सुभाष कपूर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून ३७० कलम रद्द होईल, याची खूप दिवसांपासून प्रतिक्षा होती. त्यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाने काश्मीर खोरे हे भारताच्या मुख्य प्रवाहात येईल, याची खात्री आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर हे देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीचा भाग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमधील उत्पादनाच्या प्रक्रियांवर आजतागायत बंधने होती. स्थानिक कंपन्यांबरोबर करार करून चांगले व्यावसायिक वातावरण करता येईल. याच पद्धतीने देशातील बहुतांश शहरे आणि राज्यांचा विकास झाला आहे. स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील, असेही कपूर म्हणाले.
हिमाचल प्रदेशमधील बड्डीत स्टीलबर्डने १५० कोटींची उत्पादन प्रकल्पात गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये विस्तार करून रोज ४४ हजार ५०० हेल्मेट उत्पादन घेण्याची क्षमता विकसित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काश्मीर खोऱ्यात यश मिळविता येईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.