नवी दिल्ली- फ्युचर रिटेल आणि रिलायन्समधील सौद्याच्या प्रकरणात अॅमेझॉनला दिल्ली उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. फ्युचर रिटेल लि. (एफआरएल) कंपनीला रिलायन्सबरोबरील २४,७१३ कोटींचा सौदा स्थगित करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अॅमेझॉनने फ्युचर रिटेल आणि रिलायन्समधील सौद्याला दिल्ली उच्च न्यायालयात आक्षेप घेतला आहे. सिंगापूर एमर्जन्सी आर्बिटेटरने (ईए) फ्युचर रिटेल आणि रिलायन्समधील सौद्याला स्थगिती देणारे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी याचिका अॅमेझॉनने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने सलग चार दिवस सुनावणी घेतली आहे.
संबंधित बातमी वाचा-फ्युचर रिटेलकडे अॅमेझॉनने मागितले १,४३१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई!
दिल्ली उच्च न्यायालयाने आदेशात काय म्हटले आहे?
- अॅमेझॉनच्या अधिकारांचे हितसंरक्षण करण्यासाठी तात्पुरता दिलासा देणारे आदेश काढण्यात आल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. एफआरएल आणि प्रतिवाद्यांनी पुढील निकालापर्यंत 'जैसे थे' स्थिती ठेवावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
- 'जैसे थे' स्थितीचा अहवाल १० दिवसात देण्याचे आदेश न्यायालयाने संबंधितांना दिले आहेत.
- सिंगापूर एमर्जन्सी आर्बिटेटरने स्थगितीचे आदेश दिल्यानंतर २५ ऑक्टोबर २०२० पासून काय पावले उचचली आहेत, त्याची माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने एफआरएलला दिले आहेत.