नवी दिल्ली– औषध विक्रेत्यांच्या संघटनेने दबाव आणूनही केंद्र सरकारने अल्कोहलयुक्त सॅनिटायझरला औषध परवान्यातून मुक्त ठेवले आहे. त्याबाबतची अधिसूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काढली आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी आणि व्यापक जनहितासाठी अल्कोहलयुक्त सॅनिटायझरचा औषधी व प्रसाधन कायद्यात समावेश करण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने 1940 कायद्यामधून हँड सॅनिटायझरला वगळल्याची अधिसूचना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी काढली आहे. त्यामुळे हँड सॅनिटायझरला विकण्यासाठी विक्रेत्यांना परवाना लागणार नाही. असे असले तरी अल्कोलहयुक्त सॅनिटायझरची विक्री आणि साठा करण्यासाठी औधधे आणि सौंदर्यप्रसाधने 1945 च्या कायद्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेमुळे कोणत्याही दुकानदाराला हँड सॅनिटायझरची विक्री अथवा साठा करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी औषधी आणि प्रसाधन कायद्याप्रमाणे लागणारा परवाना घेण्याची विक्रेत्यांना गरज लागणार नाही.