पणजी – देशात चीनच्या उत्पादनांवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे. मात्र, चीनच्या उत्पादनांवर भारत खूप महत्त्वाच्या उत्पादनासाठी अवलंबून असल्याचे समोर येत आहे. चीनकडून हार्डवेअरचे सुट्टे भाग मिळाले नाही, तर देशात जीएसटीची ई-फायलिंग सेवा ठप्प होईल, अशी भीती गोव्याचे मंत्री मौविन गोडिन्हो यांनी व्यक्त केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गोव्याचे वाहतूक मंत्री मौविन गोडिन्हो हे जीएसटी परिषेदेवर सदस्य आहेत. ते म्हणाले, की कोरोनाचे संकट आणि घटणाऱ्या आयातीने स्वदेशी हार्डवेअर आणि सुट्टे भागांच्या उत्पादनांना मोठे वळण मिळणार आहे. या उत्पादनांची भारताकडून आयात करण्यात येते.
पुढे ते म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर मला चिंता वाटते. मी जीएसटी परिषदेच्या बैठकीत बसतो. ई-फायलिंग करण्यासाठी काही हार्डवेअरचे सुट्टे भाग चीनमधून आयात करण्यात येतात. जर त्याची खरेदी झाली नाही, तर त्याचा गंभीर परिणाम होवू शकतो. कारण जीएसटीचे काम ऑनलाईन चालते. ते हार्डवेअरचे सुट्टे भाग खरेदी केले नाही तर त्याचा परिणाम झुआरी पुलासारखा होवू शकतो.
गोव्यातील झुआरी पुलाचे काम चीनमधील सुट्टे भाग मिळण्यास झालेला उशीर आणि कोरोनाचे संकट या कारणाने रखडले आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. कोरोनाचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर झालेला परिणाम आणि चीनबरोबर असलेली तणावाची स्थिती याला एक चंदेरी किनार (सिल्हर लाईनिंग) असू शकते, असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीमधून वैज्ञानिक, अभियंते आणि तंत्रज्ञान मनुष्यबळ मात करणार आहे. तोपर्यंत तात्पुरता त्रास होवू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.