नवी दिल्ली - वस्तू व कर सेवा परिषदेची (जीएसटी) बैठक गुरुवारी होणार होती. मात्र ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांवरील कराचा मुद्दाही लांबणीवर गेला आहे. जीएसटी परिषदेच्या अध्यक्षा तथा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये व्यस्त असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
जीएसटी परिषदेची ही ३६ वी बैठक असणार आहे. या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांवरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याच्या एकमेव प्रस्तावावर विचार करण्यात येणार आहे. पुढे ढकलण्यात आलेली जीएसटी परिषद २७ जुलैला घेण्यात येईल, असा सूत्राने अंदाज व्यक्त केला.
यामुळे ढकलली जीएसटी परिषदेची बैठक-
राज्यसभेत दिवाळखोरी आणि नादारी कायद्यातील दुरुस्तीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांना संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहणे आवश्यक आहे.