नवी दिल्ली -भारतीय सायबर सुरक्षेची शिखर संस्था सीईआरटीने ट्विटरला नोटीस पाठवली आहे. नुकतेच अमेरिकेतील प्रतिष्ठित उद्योजक व राजकीय व्यक्तींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. याबाबत भारतीय वापरकर्त्यावर काय परिणाम झाला, याची सविस्तर माहिती सीआरटीने ट्विटरकडून मागविली आहे.
ट्विटरवर मालवेअरचा हल्ला झाल्यानंतर किती भारतीय वापरकर्त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले, याची माहिती भारताने मागविली आहे.
मालवेअर लिंकचा कशा पद्धतीने वापर होतो? त्याचा किती जणांवर परिणाम झाला, याची माहितीही भारताने ट्विटरकडून मागविली आहे. त्याबाबत ट्विटरने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. नुकतेच ट्विटरच्या व्यवस्थेवर काही हॅकरने हल्ला केला. हल्ल्यात अमेरिकेतील प्रतिष्ठित उद्योगप,ती राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रिटी यांच्या अकाउंटवरून एक लिंक ट्विट करण्यात आली. त्यामागे बिटकॉइनचा घोटाळा करण्याचा उद्देश होता. याबाबत इंडियन कॉम्प्यटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने ट्विटरला अनेक प्रश्न विचारले आहेत.
सायबर हल्लेखोरांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले बिडेन, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस व मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या ट्विटरवर बुधवारी हल्ला केला होता.