नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात ५ ते ८ टक्के वाढ केल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, की ऊसाच्या रसापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलचा दर हा वाढवून प्रति लिटर ६२.६५ रुपये करण्यात आला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना होणार आहे. इथेनॉलचा दर वाढविण्यामागे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणे आणि आयातीच्या कच्च्या तेलाचे प्रमाण कमी करणे हा उद्देश आहे. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे. इथेनॉल हे पर्यावरणस्नेही आहे. त्यामुळे हवेचे प्रदुषण कमी व्हावे, हा उद्देश असल्याचेही जावडकेर यांनी यावेळी सांगितले.