नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने साखर निर्यात करण्यासाठी तीन महिन्यांची म्हणजे डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही माहिती अन्न मंत्रालयातील अधिकाऱ्याने आज दिली आहे.
साखर उद्योगाचे विपणन वर्ष (मार्केटिंग इयर) हे सप्टेंबरअखेर संपणार आहे. केंद्र सरकारकडून अनुदान मिळविण्यासाठी देशातील साखर कारखान्यांनी या वर्षात एकूण ६ दशलक्ष टन साखरेची निर्यात करणे अपेक्षित आहे. याबाबत अन्न मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुबोध कुमार सिंह म्हणाले की, साखर विपणन वर्षात ६ दशलक्ष टन साखरेची निर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ५.६ दशलक्ष टन ही साखर कारखान्यातू इतरत्र हलविण्यात आली आहे. मात्र, कोरोना महामारीत साखर कारखान्यांना वाहतूक करणे अडचणीचे ठरत आहे. कारण, काही ठिकाणी वाहतुकीवर निर्बंध आहेत. त्यामुळे निर्यात करण्यासाठी साखर कारखान्यांना डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.