नवी दिल्ली- कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बसलेल्या देशातील कोट्यवधी व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. किरकोळ (रिटेल) आणि घाऊक (व्होलसेल) विक्रेत्यांचाही एमएसएमईमध्ये समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय एमएसएमई आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून जाहीर केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमईचे सुधारित मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. त्यामध्ये प्राधान्याने कर्ज देण्याच्या क्षेत्रामध्ये किरकोळ आणि घाऊक विक्रीचाही समावेश केला आहे. एमएसएमईच्या कक्षेमध्ये किरकोळ आणि घाऊक विक्रीचा समावेश नव्हता. नव्या मार्गदर्शक सुचनानुसार किरकोळ आणि घाऊक विक्रीच्या क्षेत्राचा एमएसएमईचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आरबीआयच्या मार्गदर्शक सुचनांनुसार किरकोळ आणि घाऊक विक्रीलाही प्राधान्याने कर्ज दिले जाणार असल्याचे गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाकरिता एमएसएमई हे इंजिन करण्याकरिता हा निर्णय घेण्यात आल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-#WhereAreVaccines : लसीकरणावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका
सुधारित मार्गदर्शक सुचनांमुळे २.५ कोटी व्यापाऱ्यांना होणार फायदा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. एमएसएमई उद्योगांना अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी इंजिन करण्यात येणार आहे. सुधारित मार्गदर्शक सुचनांमुळे २.५ कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे.
हेही वाचा-मृत्यूचं तांडव!; कोरोना मृत्यूचा आकडा 4 लाख पार; रिकव्हरी रेट 97.01 टक्के