महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केंद्र सरकारची मोटार वाहन कायद्यातील सुधारणांना मंजुरी ; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या दंडाची तरतूद

रस्ते सुरक्षिततेसाठी  कठोर नियमांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अल्पवयीनांकडून वाहन चालविणे,  परवान्याशिवाय वाहन चालविणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे असे नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे.

संग्रहित

By

Published : Jun 25, 2019, 4:05 PM IST

Updated : Jun 25, 2019, 6:18 PM IST

नवी दिल्ली - रस्ते सुरक्षितता लक्षात घेवून केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील सुधारणांना सोमवारी मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित सुधारणा लोकसभेत मंजूर झाल्यास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे. यामध्ये रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास १० हजार रुपयापर्यंत वाहनचालकांना दंड करण्याची तरतूद आहे.

मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीचे विधेयक हे यापूर्वी राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र मुदत संपल्याने १६ वी लोकसभा विसर्जित झाल्याने हे विधेयक बारगळले होते. या विधेयकातील दुरुस्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिल्याचे सूत्राने सांगितले. या तरतुदी १८ राज्यांच्या वाहतूक मंत्र्यांच्या शिफारसीवरून करण्यात आलेल्या आहेत. या शिफारशी संसदेच्या स्थायी समितीकडून काळजीपूर्वक तपासण्यात आल्या आहेत.

मोटार वाहन कायद्यातील प्रस्तावित दंड


काय आहेत सुधारित मोटार वाहन विधेयकात नवे बदल-
रस्ते सुरक्षिततेसाठी कठोर नियमांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविणे, परवान्याशिवाय वाहन चालविणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे असे नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे. दारू पिवून वाहन चालविणे, भरधाव वेगात वाहन चालविणे तसेच क्षमतेहून अधिक वाहून नेणे यासाठी असलेल्या दंडात मोठी वाढ करण्यात आली आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या दंडात वाढ

  • भरधाव वेगात वाहन चालविल्यास १ हजार ते २ हजार रुपयापर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे.
  • विमा नसतानाही वाहन चालविल्यास २ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जावू शकतो.
  • हेल्मेटशिवाय वाहन चालविल्यास २ हजार रुपयापर्यंत दंड ठोठावला जावू शकतो. तसेच तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्याची कायद्यात तरतूद आहे.
  • अल्पवयीन मुलाकडून वाहन चालविण्याचा प्रकरणात वाहनाचा मालक अथवा त्या मुलाच्या पालकाला जबाबदार ठरविण्यात येणार आहे. त्यानुसार वाहनाची थेट नोंदणीच रद्द करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर संबंधित पालक व वाहन मालकाला दोषी मानून २५ हजार रुपयांचा दंड आणि तीन वर्षे कारावासाची शिक्षा आहे.
  • वाहतुकीच्या नियमाचा भंग केल्यासा आकारला जाणारा दंड हा १०० रुपयाहून थेट ५०० रुपये करण्यात येणार आहे.
  • संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न केल्यास २ हजार रुपये दंड असणार आहे. यापूर्वी नियमांचे पालन न केलेल्या वाहन चालकांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येत होता.
  • नोंदणी न केलेले वाहन हे विना परवाना चालविल्यास १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
  • धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी १ हजार रुपये दंडाची तरतूद होती.
  • दारू पिवून वाहन चालविणाऱ्यांना सर्वात मोठा दणका बसणार आहे. त्यांना १० हजार रुपये दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.
  • वाहनामधून क्षमतेहून अधिक वाहतूक केल्यास २० हजार रुपयापर्यंत दंड बसणार आहे.
  • चारचाकी चालविताना सीट बेल्ट न घातल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
  • वाहतुकीच्या नियमाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे.

हे विधेयक लोकसभेत सादर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

Last Updated : Jun 25, 2019, 6:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details