नवी दिल्ली - लग्नसराई आणि अक्षयतृतीया संपूनही सोन्याचा दर गेली सहा दिवस वाढत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजची (एमसीएक्स) सोन्याच्या कंत्राटाची मुदत ऑगस्टमध्ये संपत आहे. अशा स्थितीत सोन्याचा दर ३७० रुपयाने वाढून प्रति तोळा ३४ हजार ८११ रुपये झाला. अमेरिका आणि इराणमधील भौगोलिक-राजकीय तणावांमुळे जगभरातील गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशा स्थितीत त्यांनी सुरक्षित गुंतवणुकीकरता सोन्यामधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढविले आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले आहे. अमेरिकेच्या आगामी मध्यवर्ती बँकेच्या खुल्या बाजाराच्या समितीच्या बैठकीत (एफओएमसी) व्याजदाराच्या कपातीचा निर्णय होवू शकतो. आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा वर्षातील सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. डॉलर आणखी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे केडिया इन्व्हेस्टर्सच्या अहवालात म्हटले आहे.