नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अनोख्या उत्पादनांचे लाँचिग केले. यामध्ये गायीच्या शेणापासून तयार केलेले साबण व बांबूपासून तयार केलेल्या बॉटलचा समावेश आहे.
महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीच्या पूर्वसंध्येला (१ ऑक्टोबरला) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि परिवहन तथा एमएसएमई मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सेंद्रीय शेतीचा मी पुरस्कर्ता आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या उत्पादनांचा नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सूचिबद्ध यादीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
हेही वाचा-स्मार्टफोनचे नवे युग: दुमडू शकणारा 'सॅमसंग फोल्ड' भारतातही; ही आहेत वैशिष्ट्ये
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या यादीत २० एमएसएमई उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. या उद्योगांनी भांडवली बाजारात प्रवेश केला आहे. अशा उद्योगात १० टक्के सरकारने शेअर घेण्याचा प्रस्ताव वित्तीय मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीसी) १० हजार कोटींची उलाढाल गाठावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. यातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी, असेही ते म्हणाले.