लातूर- दुष्काळ आणि मंदी असताना जिल्ह्यातील वाहन उद्योगाला सणासुदीदरम्यान संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. बाजारपेठात शुकशुकाट असताना अनेक लातूरकरांनी वाहन खरेदीची हौस पूर्ण केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत किंचितशी घट झाली आहे.
यंदा जिल्ह्यातील प्रत्येक सणादरम्यान दुष्काळाचा बाजारपेठेवर परिणाम दिसून आला. अशातच दिवाळीपर्यंत दुष्काळाबरोबर आर्थिक मंदी, असे दुहेरी संकट निर्माण झाले होते. त्यामुळे उद्योजक आणि शेतकरी हे वाहन खरेदीकडे वळणार का, अशी वाहन उद्योगामधून चिंता व्यक्त होत होती. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात तब्बल 3 हजार 862 दुचाकींची विक्री झाली आहे. तर 419 चार चाकी वाहनांची विक्री झाली आहे.
हेही वाचा-वाहन उद्योगांवरील मंदीचे सावट कायम; प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग ११ व्या महिन्यात घट
2018 च्या तुलनेत दुचाकींच्या विक्रीत 6 टक्के घट झाली आहे. तर चारचाकी वाहनांच्या खरेदीत 3 टक्के घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीत घट झाली असली तर त्या प्रमाणात वाहन विक्रीला फटका बसला नसल्याचे वाहन उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.