हैदराबाद - भारतीय रिझर्व्ह बँकेने ४० बेसिस पाँईटने रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंबांना आणि अनेक लोकांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली टाळेबंदी, नोकऱ्यांमधील कपात आणि पगार कपातीने अनेकजण संकटात सापडले आहेत.
सर्वच अन्नपदार्थांच्या किंमती वाढत असल्याने अनेकांना कुटुंबांचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होत आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) दिलेल्या आकडेवारीचा आधार घेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की अपूरी आकडेवारी मिळालेली आहे. अन्नाची महागाई ही जानेवारी २०२०मध्ये सर्वोच्च शिखरावर होती. त्यानंतर मार्चमध्ये ही महागाई कायम राहिली. हे प्रमाण वाढून एप्रिलमध्ये ८.६ टक्के झाले आहे.
अनेक लोक व व्यावसायिक घरातच राहत आहेत. त्यामुळे आणि उन्हाळ्यात चालू असलेल्या पंखे, एसीसारख्या उपकरणांमुळे वीजेचे मासिक बिल वाढत आहे. याशिवाय इंटरनेट व वैद्यकीय बिल यांचा खर्च वाढत असल्याने लोकांचे बजेट कोसळत आहे. आरबीआयने कर्जदारांना आणखी तीन महिन्यांनी कर्ज भरण्याची मुभा दिली आहे. या निर्णयाचे पर्सनल फायनान्स तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. आरबीआयने रेपो दर ४० बेसिस पाँईटने कमी करून ४ टक्के केल्याचेही तज्ज्ञांनी स्वागत केले.
हेही वाचा-चालू वर्षात देशाच्या जीडीपीचा विकासदर उणे राहील- आरबीआय गव्हर्नर