मुंबई- पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाईचा पाश आवळण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसीचा माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमसला अटक केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने जॉय थॉमसला समन्स बजावले होते. चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एचडीआयएलचा संचालक राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग वाधवान या पिता-पुत्रालाही आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली आहे.
हेही वाचा-पीएमसी बँकेतून आता काढता येणार २५ हजार रूपये...
काय आहे नेमका घोटाळा-
पीएमसी बँकेकडे ३१ मार्चपर्यंत ११ हजार ६१७ कोटींच्या ठेव्या होत्या. तर ८ हजार ३८३ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम होती. बँकेने मार्च २०१९ ला ९९.६९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. तर बँकेची २.१९ टक्के बुडित कर्जे (एनपीए) होती.
आरबीआयच्या नियमानुसार शहरी सहकारी बँकेला एकूण भांडवलापैकी १५ टक्के कर्ज हे वैयक्तिक कर्जदारांना देता येतात. तर ४० टक्के कर्ज हे उद्योगसमुहाला देता येतात. पीएमसीकडे ३१ मार्चपर्यंत १ हजार ५५ कोटींचे भांडवल होते. मात्र बँकेने एचडीआयएलचे संचालक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना ६ हजार ५०० कोटींचे कर्ज दिले. हे कर्ज बँकेच्या क्षमतेहून अधिक देवून नियमांचे उल्लंघन करण्यात आले.
हेही वाचा-काय आहेत पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध?
निलंबित करण्यात आलेल्या जॉय थॉमसने बँकेतील गोंधळाच्या स्थितीला लेखापरीक्षक जबाबदार असल्याचे म्हटले होते. जॉय थॉमसने आरबीआयला पत्र लिहून बुडित कर्जांची संख्या लपविल्याचे कबूल केले. त्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापनासह काही संचालक मंडळाचे सदस्य जबाबदार असल्याचे आरबीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले. एचडीआयएल या दिवाळखोरीत असलेल्या कंपनीने बँकेचे सुमारे ६ हजार ५०० कोटी रुपये थकविल्याचे बोलले जात आहे. या एकाच उद्योगसमुहावर मेहेरेनजर दाखविल्याने बँक अडचणीत सापडली आहे.
हेही वाचा-खातेधारकांची पीएमसी बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी
एचडीआयएलवरही कारवाईचा बडगा
सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी) घोटाळाप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ईडीने पीएमसीमधील ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलच्या प्रवर्तकांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. ईडीने मुंबईत सहा ठिकाणी छापेही टाकले आहेत.
एचडीआयएल ही दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असल्याचे बोलले जात आहे. याच ग्रुपने पीएमसी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतली होती. पीएमसी बँकेचे वसुली विभागाचे व्यवस्थापक जसबीर सिंग मट्टा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. बँकेकडून घेण्यात येणारे कर्ज लपविण्यासाठी बनावट २१ हजार ४९ बँक खाती तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. पीएमसी ही देशातील पहिल्या दहामध्ये असलेली शहरी सहकारी बँक आहे.