नवी दिल्ली - कोरोना महामारीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. ईपीएफओने एप्रिल ते ऑगस्टमध्ये ३५ हजार ४४५ कोटी रुपयांचे ९४.४१ लाख कोटी दावे मंजूर केल्याची माहिती कामगार मंत्रालयाने दिली आहे.
चालू वर्षात एप्रिल ते ऑगस्टमध्ये ईपीएफओचे दावे मंजूर करण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी वाढले आहे. गतवर्षीच्या एप्रिल ते ऑगस्टच्या तुलनेत यंदा १३ टक्के अधिक रकमेचे वितरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटात आर्थिक संकटात सापडलेल्या सदस्यांना आगाऊ रक्कम आणि आजारासंबंधी दाव्यासाठी रक्कम वेगाने देण्यात आल्याचे ईपीएफओने म्हटले आहे. त्यासाठी ईपीएफओने स्वयंचलित पद्धतीने आगाऊ रक्कम देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ईपीएफओच्या सदस्यांना तीन दिवसांत खात्यावर रक्कम मिळत होती. यापूर्वी ही रक्कम मिळण्यासाठी २० दिवस लागत होते, असे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे.