नवी दिल्ली- भारतीय औषध महानियंत्रण संचालनालयाने (डीसीजीआय) फायझरच्या कोरोना लशीला विशेष चाचणीच्या नियमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. डीसीजीआयच्या निर्णयानंतर फायझर कंपनीने भारतामधील लसीकरण मोहिमेसाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकारबरोबर बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे.
भारतामध्ये लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारबरोबर फायझर कंपनीची चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेची माहिती सध्या देणे शक्य नसल्याचे फायझरच्या प्रवक्त्याने सांगितले.
हेही वाचा-अमेरिकेचे एक पाऊल पुढे! फायझरची लस १२ ते १५ वयोगटातील मुलांनाही मिळणार
लशींना मर्यादित वापरासाठी परवानगी मिळणार
आंतरराष्ट्रीय नियामक संस्थांनी ज्या कोरोना लशीला परवानगी आहे, अशा लशींना डीसीजीआय विशेष परवानगी देणार आहे. यामध्ये फायझर आणि मॉर्डनचा समावेश होण्याची शक्यता आहे. देशामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढलेले असल्याने केंद्र सरकारकडून देशात लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डीसीजीआयचे प्रमुख व्ही. जी. सोमानी म्हणाले, की युएस एफडीए, ईएमए, युके एमएचआरए, पीएमडीए जपान, जागतिक आरोग्य संस्था या नियामक संस्थांकडून परवानगी मिळाली तर लशींना मर्यादित वापरासाठी परवानगी मिळणार आहे.
हेही वाचा-ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून फायझर अस्ट्रॅाझेनेकाची माघार
यापूर्वी कोट्यवधी जणांना लस मिळाली आहे, अशा लशींना सेंट्रल ड्रग्स लॅबोरटरीकडून प्रत्येक बॅचच्या चाचणीमधून वगळण्यात येऊ शकते. मात्र, त्या लशीच्या बॅचला संबंधीत देशाच्या राष्ट्रीय नियंत्रक प्रयोगशाळेकडून प्रमाणीकरण मिळणे आवश्यक आहे.
प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये तयार होतात अधिक अँटिबॉडीज-
अमेरिकेची अन्न आणि औषध प्रशासनाने फायझर लस ही लहान मुलांसाठी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. या लशीची चाचणी १२ ते १५ वयोगटातील २ हजारांहून अधिक मुलांवर घेण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे लस घेतलेल्या मुलांमध्ये कोरोनाला प्रतिबंधक अशा अँटीबॉडीज या प्रौढांच्या तुलनेत अधिक तयार होत असल्याचे आढळून आले आहे. फायझर आणि जर्मन पार्टनर बायोनटेक कंपनीने लशीच्या वापरासाठी युरोपीयनसह इतर देशांमध्ये परवानगी मागितली आहे. फायझर ही लहान मुलांसाठी लस उत्पादन करणारी एकमेव कंपनी आहे.