नवी दिल्ली -लोकसभेची निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरू आहे. गेल्या नऊ दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर ७० ते ८० पैशांनी वाढले आहेत.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढूनही एप्रिल-मेमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिले होते. लोकसभेच्या अंतिम टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. गेल्या नऊ दिवसात पेट्रोलचे दर प्रति लिटर ८३ पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ७३ पैशांनी वाढले आहेत.
मतदानाच्या शेवटच्या दिवशी आणि आजचे पेट्रोल-डिझेलचे दर पाहा-
मंगळवारी पेट्रोलचा दर ११ पैशांनी तर डिझेलचा दर ५ पैशांनी वाढला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी १९ मे रोजी शेवटची मतदान प्रक्रिया पार पडली. या दिवशी दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७१.०३ रुपये होते. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर ७१.८६ रुपये आहे. तर डिझेलचा प्रति लिटर दर ६६.६९ रुपये आहे. दिल्लीत १९ मे रोजी डिझेलचा दर प्रति लिटर ६५.९६ रुपये होता. मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचा दर ७७.४७ रुपये आहे. तर डिझेलचा दर ६९.८८ रुपये आहे.
निवडणूक काळात सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात-
निवडणुकीच्या काळात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियमने (HPCL) या सरकारी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यापूर्वी केंद्र सरकारने मे २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीदरम्यानही पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले होते.