नवी दिल्ली - लंडनमधील अटक करण्यात आलेल्या नीरव मोदीला आणखी एक धक्का बसणार आहे. सक्त आर्थिक अंमलबजावणी संचालनालय लवकरच कर्जबुडव्या नीरव मोदीची मालमत्ता असलेल्या १७३ पेंटिंग आणि ११ कार विकायला काढणार आहे. त्यासाठी ईडीने बुधवारी मुंबईच्या विशेष न्यायालयाची परवानगी काढली आहे. या मालमत्तेचा लिलाव हा २६ मार्चला होणार आहे.
नीरव मोदीला लंडनमधील होलबोर्न येथे अटक करण्यात आली आहे. मोदीवर पंजाब नॅशनल बँकेची १३ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अटकेतील मोदीची २९ मार्चपर्यंत मेट्रोपॉलिटियन पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने मोदींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.मोदीचे पेंटिंग आणि वाहनांची एकूण किंमत ५७.७२ कोटी आहे. यामध्ये रॉल्स रॉयस, पॉर्शे, मर्सिडीज आणि टोयोटो फॉर्च्युअनर अशा ८ कार आहेत.
ईडीने नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांची एकूण ४ हजार ७६५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. दोघांनीही भारतामधून विदेशात पळ काढला आहे. अमेरिकेच्या न्यायालयानेही नीरव मोदीची पत्नी अमी मोदी हिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजाविले आहे. मनी लाँड्रिग करून न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क येथे बेकायदेशीर मालमत्ता आरोप केल्याचा अमी मोदीवर आरोप आहे. ईडीनेही भारतात अमीविरोधात आरोपत्र दाखविले आहे.
न्यायालयाने प्राप्तीकर विभागाला मोदीच्या ६८ पेटिंग विकण्याची परवानगी दिली आहे. इंग्लंडकडून नीरव मोदीचे लवकरत भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. नीरव मोदी आणि चोक्सीच्या गुन्हेप्रकरणाचा ईडी आणि सीबीआयकडून तपास सुरू आहे. ईडीने मनी लाँड्रिगप्रकरणी नीरव मोदीसह इतरावर १५ फेब्रुवारी २०१८ ला गुन्हा नोंद केला आहे. यापूर्वी सीबीआयनेही नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा नोंदविला आहे.