नवी दिल्ली- येस बँकेचे संचालक राणा कपूर यांना अटक केली आहे. राणा कपूर यांनी काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांच्याकडून एम. एफ. हुसैन यांनी काढलेले तैलचित्र २ कोटी रुपयांना विकत घेतले होते. या प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे.
येस बँकेच्या प्रकरणाचा प्रियंका गांधींशी संबंध जोडला जात असल्याने काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. प्रियंका वड्रा यांनी प्राप्तिकर परताव्याचे विवरणपत्र भरताना तैलचित्रापासून मिळविलेल्या उत्पन्नाची माहिती दिली होती, असे काँग्रेसने म्हटले आहे.
ईडीच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते मिलिंदा देवरा यांनी १ मे २०१० ला पत्र लिहून तैलचित्र विकत घेण्यासाठी प्रियंका गांधी यांच्यांशी संपर्क करण्यास राणा कपूर यांना सांगितले होते. तसेच ते तैलचित्र हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे असल्याचे देवरा यांनी पत्रात म्हटले होते. हे तैलचित्र प्रियंका यांनी कपूर यांना जून २०१० मध्ये विकण्यात आले. यापूर्वी तैलचित्र कधीच विकण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याच्या किमतीचे मूल्यांकन करण्यात येत असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.