नवी दिल्ली- गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीदरम्यान सकल राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे. बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील संकटामुळे जीडीपी घसरल्याचे अर्थव्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
गर्ग म्हणाले, बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील संकटाचा आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील चौथ्या तिमाहीवर तात्पुरत्या काळासाठी परिणाम झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही दरम्यानदेखील जीडीपीवर परिणाम होणार आहे. दुसऱ्या तिमाहीनंतर जीडीपी उंचावेल, असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला. भांडवली गुंतवणुकीसह खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल, असेही गर्ग म्हणाले.
असा आहे जीडीपी-
२०१८-२०१९ मधील जानेवारी-मार्चमदरम्यान सकल राष्ट्रीय उत्पन्नाची (जीडीपी) ५.८ टक्के नोंद झाली आहे. हे जीडीपीचे प्रमाण गेल्या पाच वर्षात सर्वात कमी आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्येदेखील ६.४ टक्के एवढ्या कमी जीडीपीची नोंद झाली आहे
बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक-
कृषी क्षेत्रासह उत्पादन क्षेत्राची कामगिरी मंदावल्याने अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण गेल्या ४५ वर्षात सर्वात अधिक होते. ही बाब मोदी सरकारने फेटाळून लावली होती. मात्र केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती सत्य असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे ६.१ टक्के होते.