हैदराबाद -देशात कोरोना लशीचा तुटवडा निर्माण झाला असताना दिलासादायक बातमी आहे. भारतीय औषधी नियंत्रक संस्थेने रशियन कोरोना लस स्पूटनिक व्हीच्या आपत्कालीन वापराची डॉ. रेड्डीज लॅबोरटरीजला परवानगी दिली आहे.
डॉ. रेड्डीज लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सॅप्रा यांनी यापूर्वीच म्हटले की, ७० टक्के चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लवकरच लसीकरण सुरू होईल, अशी आशा आहे. स्पूटनिक लसीच्या उत्पादनासाठी स्थानिक उत्पादकांशी चर्चा सुरू आहे. लशीची किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. सरकारसह खासगी क्षेत्राला गरजेप्रमाणे लशीचा पुरवठा करण्याचे कंपनीने नियोजन केले आहे. डॉ. रेड्डीजच्या प्रवक्त्याने म्हटले, की पहिल्या तिमाहीत लशींची पहिली बॅच आयात होईल, असे आमचे उद्दिष्ट आहे. तर मे महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, यासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न करत आहोत.
हेही वाचा-कोरोनावरील 'स्पूटनिक व्ही' लस फायझरसह मॉर्डनहून स्वस्त; रशियाचा दावा
स्पूटनिक व्ही लशीबाबत महत्त्वाचे मुद्दे
- डॉ. रेड्डीजने सप्टेंबर २०२० मध्ये रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून स्पूटनिक व्हीची चाचणी घेण्यात येणार आहे.
- स्पूटनकि व्ही ही लस विकसित करणाऱ्या गॅमेलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडिमिलॉजी आणि मायक्रोबायॉलॉजीला भारतात 125 दशलक्ष लशीचे डोस देण्याची परवानगी मिळालेली आहे.
- नुकतेच आरडीआयएफचे सीईओ किरील दमित्रिएव यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत भारतामध्ये 50 दशलक्ष डोसचे उन्हाळ्यात उत्पादन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी आरडीआयएफने भारतामधील पाच औषधी कंपन्यांबरोबर करार केले आहेत.
- स्पूटनिक व्ही भारतामध्ये उपलब्ध होणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. यापूर्वी भारताने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
हेही वाचा-'स्पूटनिक व्ही' मार्चमध्ये लाँच करण्याचा डॉ. रेड्डीजचा प्रयत्न