नवी दिल्ली - कांद्याचे भाव वाढल्याने भारतीयांनाच नव्हेतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही परिणाम झाला आहे. आपल्या आचारीला अन्नात कांद्याचा वापर करू नका, असे त्यांनी सांगितले आहे. भारताने कांदा निर्यात बंद करण्यापूर्वी त्याची माहिती द्यायला हवी होती, असेही त्यांनी सांगितले. त्या भारत-बांगलादेश उद्योग मंचात बोलत होत्या.
भारत-बांगलादेश उद्योग मंचाने परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे आयोजन सीआयआय आणि अॅसोचॅमच्यावतीने करण्यात आले आहे. या परिषदेत बोलताना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना म्हणाल्या, भारताने अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने बांगलादेशमधील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मला माहित नाही, तुम्ही कांद्याची निर्यात का थांबविली? मात्र, निर्यात बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही माहिती दिल्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा-पीएमसी घोटाळा: ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची नोंद; मुंबईत सहा ठिकाणी छापे
दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये व्यापार करण्यासाठी प्रचंड क्षमता असल्याचे त्यांनी म्हटले. दक्षिण आशियात बांगलादेशमध्ये सर्वात अधिक गुंतवणुकीसाठी उदारीकरणाचे धोरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये विदेशी गुंतवणूक संरक्षण कायदा व मशिनरीच्या आयात शुल्कात सवलत आदी बाबी असल्याचे त्यांनी सांगितले. भारतामधील मोठे उद्योजक बांगलादेशमध्ये उद्योग सुरू करू शकतात. त्यामुळे त्यांना उत्तर-पूर्वेकडील भारताच्या राज्यासंह दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये निर्यात करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.