नागपूर - बारावीचा निकाल लागतच सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना पेढे खाऊ घातले जात आहेत. नागपुरातही अत्यंत उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. नागपुरातील दिव्यांग असलेल्या सिद्धार्थ उमाठेने स्वतःच्या शारीरिक कमकुवतेवर मात करत बारावीत ८४.०५ टक्के इतके गुण मिळवले आहे. त्यामुळे सिद्धार्थचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
ध्येय गाठायचं असेल तर जिद्द हवी असे बहुतांशवेळी बोलल्या जाते. नेमके याच वाक्याला सत्यात उतरवले ते नागपूरच्या सिद्धार्थ उमाठे या बारावीतील विद्यार्थाने. सिद्धार्थ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयचा विद्यार्थी आहे. त्याने संगणक विज्ञान शाखेतून हे गुण संपादन केले आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थला शारीरिक त्रास आहे. त्याला 'गठियावात'(आर्थराइटिस) नावाचा आजार आहे. हा आजार सिद्धार्थ ४ वर्षाचा असल्यापासून आहे. त्यामुळे त्याला दिवसातून १३ वेळा औषधी घ्यावे लागतात.