वॉशिंग्टन - कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाने वॉल्ट डिस्ने वर्ल्डमधील सुमारे ११ हजार कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. कंपनीने डिसेंबरपर्यंत या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे नियोजन केले आहे.
वॉल्ट डिस्ने वर्ल्डने ओरॅलँडो येथील स्थानिक नेत्यांना व सरकारला कर्मचारी कपात करणार असल्याचे पत्र दिले आहे. या कपातीमध्ये ११ हजार कर्मचारी हे कामगार संघटनेचे सदस्य आहेत. ते अर्धवेळ काम करत होते, असे वॉल्ट डिस्ने वर्ल्डने म्हटले आहे.
आणखी ६ हजार ४०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात!
वॉल्ट डिस्ने वर्ल्ड अधिकाऱ्याच्या माहितीनुसार फ्लोरिडामधील ६ हजार ४०० कर्मचारी हे नोकऱ्या गमावू शकतात. आठवडाभरापूर्वीच डिस्ने वर्ल्डमधील ७२० अभिनेते आणि गायकांना कंपनीने कामावरून कमी केले होते. हे कलाकार फ्लोरिडामध्ये लाईव्ह मनोरंजनात काम करत होते, असे अभिनेत्यांची संघटना अॅक्टर इक्विटी असोसिएशनने म्हटले आहे.
कोरोना महामारीमुळे पार्क राहिली बंद-
कंपनीने गेल्या महिन्यात कॅलिफॉर्निया आणि फ्लोरिडामधील २८ हजार कर्मचारी नोकरीमधून कमी केले आहेत. कोरोना महामारीमुळे फ्लोरिडामधील डिस्ने पार्क हे उन्हाळ्यात बंद राहिले होते. फ्लोरिडामधील पार्क हे मर्यादित पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यासाठी वेळेची मर्यादा, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणे पर्यटकांना बंधनकारक करण्यात आले आहे. कॅलिफॉर्निया राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधने लागू केली आहेत. त्यामुळे कॅलिफॉर्नियामधील वॉल्ट डिस्नेचे पार्क अजून उघडलेले नाही.