नवी दिल्ली - डीबीएस बँक इंडियामध्ये सिंगापूरची पालक कंपनी डीबीएस २,५०० कोटी रुपयांचे भांडवल गुंतवणूक करणार आहे. लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँक इंडियात नुकतेच विलिनीकरण झाले आहे.
लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस इंडियामध्ये २७ नोव्हेंबर २०२० ला विलिनीकरण करण्यात आले आहे. डीबीएसचे भांडवल आणि भांडवलाच्या प्रमाणाचे गुणोत्तर (सीएआर) हे नियाम संस्थेच्या गरजेहून चांगले आहे. लक्ष्मी विलास बँकेचे विलिनीकरण झाल्याने या बँकेतील ठेवीदार, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात हित जोपासले जाईल, असे डीबीएस बँकेने म्हटले आहे.
हेही वाचा-विजय मल्ल्याला ईडीचा दणका; फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त
लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली तर ग्राहकांना डीबीएसच्या सर्व उत्पादने आणि सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये डीबीएस डिजीटल बँकिंग सेवेचा समावेश आहे. यापूर्वी लक्ष्मी विलास बँकेने इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्समध्ये विलिनीकरण करण्याची तयारी दर्शविली होती. हा प्रस्ताव आरबीआयने फेटाळला होता.
हेही वाचा-कॉर्पोरेटला बँकिंग परवाने देण्याची अंतर्गत समितीची केवळ सूचना-शक्तिकांत दास
व्याजदर पूर्वीप्रमाणेच कायम राहणार-
लक्ष्मी विलास बँकेच्या बचत खात्यावरील व्याजदर आणि ठेवीवरील व्याजदर हे पूर्वीप्रमाणे राहणार असल्याचे डीबीएस बँकेने म्हटले आहे. डीबीएस बँकेच्या अटीप्रमाणे लक्ष्मी विलास बँकेच्या कर्मचाऱ्यांची सेवा पूर्वीप्रमाणे सुरुच राहणार आहे. मूळची सिंगापूरची असलेली डीबीएस बँक ही येत्या महिन्यात लक्ष्मी विलास बँकेची सिस्टिम आणि नेटवर्कवर काम करणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांना डीबीएसची सर्व उत्पादने आणि सेवा मिळणे शक्य होणार आहे.