चेन्नई - सीमा शुल्क, वस्तू व सेवा कर वाढविल्याने सोन्याच्या तस्करींचे प्रमाण वाढल्याचे अखिल भारतीय मौल्यवान रत्ने आणि दागिने परिषदेने म्हटले आहे. तसेच दुबई, नेपाळ, श्रीलंका व सिंगापूर अशा देशांमधून ग्राहक सोने खरेदी करत असल्याचे परिषदेचे चेअरमन अनंत पद्मनाभन यांनी सांगितले.
सोन्यावरील आयात शुल्क आणि जीसीटी कमी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतल्याचे अनंत पद्मनाभन यांनी सांगितले. गेल्या सहा वर्षात सोन्याच्या व्यवसायात ३० टक्क्यांची घसरण झाल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.
हेही वाचा-खाद्यतेलाच्या दरात महिनाभरात १५ टक्क्यांहून अधिक वाढ; जाणून घ्या नेमके कारण
केंद्र सरकारने १५ जानेवारी, २०२१ पासून सोन्याचे मानांकन (हॉलमार्क) बंधनकारक करण्याची अधिसूचना काढण्याची तयारी सुरू केली आहे. ही अधिसूचना काढण्यापूर्वी सरकारने सुकाणू समिती नेमावी, अशी त्यांनी मागणी केली. तसेच सुकाणू समितीमार्फत केंद्र सरकारने उद्योगांची भूमिका जाणून घ्यावी, अशी पद्मनाभन यांनी अपेक्षा व्यक्त केली. विविध कारणांमुळे सोन्याची आयात घटल्याचे त्यांनी सांगितले. वर्ष २०१९ मध्ये ७१० टन सोन्याची आयात करण्यात आली आहे. तर वर्ष २०१८ मध्ये ७६६ टन सोन्याची आयात झाली होती.
हेही वाचा-'या' मालमत्तेत भारतीय रिझर्व्ह बँकेने वाढविली गुंतवणूक
येत्या काळात सोन्याचे दर कसे राहणार?
अमेरिका आणि इराणमधील तणावस्थितीमुळे दागिने उद्योगावर परिणाम झाला. त्यामुळे चालू वर्षात सोन्याच्या किमती अस्थिर राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपर्यंत सोन्याच्या किमती वाढत जातील, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी सोने व दागिने उद्योगाच्या व्यवसायात ३० टक्क्यांची घसरण झाली. चालू वर्षात व्यवसायात १० टक्के वाढ होईल, अशी अनंत पद्मनाभन यांनी आशा व्यक्त केली.