नवी दिल्ली -येस बँकेच्या अनेक खातेदारांना बँकेमध्ये सर्व आलबेल नसल्याचे वाटत नव्हते. त्यामुळे खातेदारांनी २०१९ मध्ये मार्च-सप्टेंबरदरम्यान सुमारे तब्बल १८ हजार १०० कोटी रुपये काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मागील आर्थिक वर्षात येस बँकेकडे सुमारे २ लाख २७ हजार ६१० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. त्यामध्ये घसरण होवून चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २ लाख २५ हजार ९०२ कोटी रुपयांच्या ठेवी राहिल्या आहेत. तर दुसऱ्या तिमाहीअखेर येस बँकेकडे २ लाख ९ हजार ४९७ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. मार्च २०१९ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान बँकेकडील ठेवी १८ हजार ११० कोटी रुपयांनी कमी झाल्या आहेत. मात्र, चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील वित्तीय कामगिरीची आकडेवारी जाहीर केली नाही. त्यामुळे सप्टेंबरनंतरची आकडेवारी जाहीर होवू शकली नाही. दिल्लीच्या एका ग्राहकाने सांगितले की, केवळ कमीत कमी खात्यावर रक्कम ठेवली होती.
गतवर्षी बँकेचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापन अस्थिर असल्याचे व बँकेच्या भवितव्याबाबत चिंता करणाऱ्या विविध पोस्ट समाज माध्यमात फिरत होत्या. त्यावर येस बँकेने आर्थिक स्थिती स्थिर आणि चांगली असल्याचा दावा केला होता. तसेच बँक चालविण्यासाठी पुरेशी चलन तरलता असल्याचेही ८ जूलै, २०१९ ला म्हटले होते.