हैदराबाद – कोरोना महामारीवर लस उपलब्ध होण्याची संपूर्ण जगाला प्रतिक्षा आहे. अशा स्थितीत भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) कोरोनाची लस ही 15 ऑगस्टला लोकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले आहे. लसीचे संशोधन, चाचण्या व त्यासाठी सरकारकडून परवानगी मिळण्याची प्रक्रिया किचकट आहे. असे असतानाही देशात वेगाने लस विकसित होत आहे.
आयसीएमआरने हैदराबादमधील भारत बायोटेक इंटरनॅशनच्या (बीबीआयएल) भागीदारीबरोबर लस विकसित करत असल्याचे गुरुवारी म्हटले आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले, की कोरोनाची लस 15 ऑगस्ट 2020 पर्यंत सार्वजनिक आरोग्यासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. सर्व वैद्यकीय चाचण्यांची पूर्तता करण्यासाठी बीबीआयएल वेगाने काम करत आहे. मात्र, अंतिम परिणाम हा सर्व वैद्यकीय चाचण्यांवर अवलंबून असणार आहे.
देशातील पहिल्या कोरोना लसीची (कोवॅक्सिन) मानवी चाचणी घेण्याची परवानगी भारतीय औषधी महानियंत्रकांनी दिल्याचे भारत बायोटेकने सोमवारी सांगितले. विशेष म्हणजे 52 दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने आयसीएमआर आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेबरोबर भागीदारीचा करार केला आहे. या 52 दिवसांमध्ये कंपनीने चाचणीपूर्वीचा सर्व अभ्यास आणि प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.