हैदराबाद - एशियन डेव्हलपमेंट बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कोरोना विषाणूचा आर्थिक पातळीवर झालेला नकारात्मक परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेला ५.८ लाख कोटी डॉलर्स ते ८.८ लाख कोटी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. हे प्रमाण जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ६.४ ते ९. ७ टक्के इतके असेल.
जागतिक पातळीवर होणाऱ्या एकूण नुकसानीमध्ये ३० टक्के वाटा आशिया -पॅसिफिक विभागाचा राहण्याचा अंदाज आहे. या विभागाला लघुकालीन ३ महिन्यापर्यंतच्या कालावधीसाठी साधारणतः १.७ लाख कोटी डॉलर्स तर दीर्घकालीन ६ महिन्यापर्यंतच्या कालावधीसाठी अंदाजे २.५ लाख कोटी डॉलर्स पर्यंतचा फटका बसण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
तर पीपल्स रिप्लब्लिक ऑफ चायनाचे (पीबीसी) सर्वाधिक अंदाजे १.१ लाख ते १.६ लाख कोटी डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या अगोदर ३ एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलूक (एडिओ) २०२०'मध्ये कोविड १९च्या संकटामुळे जगाचे २ लाख कोटी डॉलर्स ते ४.१ लाख कोटी डॉलर्सचे आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
कोव्हिड १९ला तोंड देताना आपल्या देशाचे कमीत कमी नुकसान व्हावे म्हणून जगभरातील सरकारांनी अनेक उपाययोजना आखल्या असल्याचे एडीबीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये वित्तीय आणि आर्थिक सुलभता वाढविण्यासाठी आर्थिक पॅकेजेस देणे, आरोग्यावरील खर्च वाढविणे आणि नागरिकांच्या उत्पन्न आणि महसुलात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी थेट मदत यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. सरकारांच्या या प्रयत्नात सातत्य राहिल्यास कोव्हिड-१९मुळे होणाऱ्या नुकसानीत ३० ते ४० टक्क्यांनी घट होऊ शकते असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जगाचे होणारे आर्थिक नुकसान ४.१ लाख कोटी ते ५.४ लाख कोटी डॉलर्स राहू शकते असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हे विश्लेषण करताना ग्लोबल ट्रेड अॅनालिसिस प्रोजेक्टच्या इक्विलिब्रियम मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये मोजण्यायोग्य विविध ९६ घटकांचा अभ्यास करण्यात येतो. दरम्यान जगभरात कोरोनाने बाधित झालेल्यांची संख्या ४० लाखांच्या पुढे पोचली आहे.
एडीओ २०२० च्या अंदाजात समाविष्ट केलेल्या पर्यटन, कंझमशन (वस्तू उपभोग), गुंतवणूक आणि व्यापार व उत्पादन या घटकांव्यतिरिक्त नवीन अहवालात पर्यटन आणि इतर उद्योगांवर परिणाम करणाऱ्या व्यापार खर्चामध्ये होणारी वाढ, पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने उत्पादन आणि गुंतवणूकीवर होणारा विपरीत परिणाम आणि कोव्हिड १९ मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारांकडून उचलली जाणारी पावले यांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन अहवालात कोव्हिड-१९ मुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांचे व्यापक स्वरूपात विश्लेषण करण्यात आले असल्याचे एडीबीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ यासुयुकी सवाडा यांनी म्हटले आहे.