नवी दिल्ली - तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज असताना केंद्र सरकारच्या अभ्यास समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या अभ्यास समितीने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची २ ते १८ वर्षे वयोगटासाठी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी शिफारस केली आहे.
कोव्हॅक्सिनची लहान मुलांवरील वैद्यकीय चाचणी ही एम्स, दिल्ली, एम्स पाटणा आणि नागपूरमधील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये येथे घेण्यात येणार आहेत.
२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील लशींच्या परिणामांची घेतली जाणार माहिती
कोविड १९ च्या सेंट्रल ड्रग्स स्टँण्डर्ड कंट्रोल ऑरगायझेशनच्या (सीडीएससीओ) विषयतज्ज्ञ समितीने (एसईसी) हैदराबादमधील भारत बायोटेकला लहान मुलांवरील वैद्यकीय चाचणीची परवानगी दिली आहे. या चाचणीदरम्यान २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील सुरक्षितता, प्रतिकारक्षमता आणि प्रतिक्रियात्मकता तपासली जाणार आहे.