जळगाव - कधी अस्मानी तर कधी सुलतानी त्यात कोरोना अशा तिहेरी संकटात जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सापडला आहे. जिल्ह्यातून परदेशात होणारी केळीची निर्यात गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १५ हजार क्विंटल केळी पडून आहे.
जगासह देशात कोरोना थैमान घालत असल्याने केंद्र व राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. याचा परिणाम जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेल्या केळी व्यवसायावर झाला आहे.
कोरोना विषाणू व आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या केळीमुळे जिल्ह्यातू होणाऱ्या केळी निर्यातीवर परिणाम झाला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने आयात होणारा माल देशाच्या सीमेवर १४ दिवस थांबविण्याचे आदेश तीन दिवसांपूर्वी दिले आहेत. हीच स्थिती सौदी राष्ट्रांमध्येही असल्याने केळीची निर्यात थांबण्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाळूत डोके खुपसले, राहुल गांधींची टीका
नवती व पिलबागांमधील केळी मोठ्या प्रमाणावर कापणी योग्य अवस्थेत आहे. मात्र कोरोना विषाणूमुळे परदेशातील व देशातील उत्तरेकडील राज्यातील व्यापाऱ्यांकडून होणारी मागणी घटल्याने केळीची कापणी होत नाही. बागांमध्ये कापणी अभावी केळी साठण्याचे प्रमाण वाढत आहे.