नवी दिल्ली - कोरोना महामारीत गरिबांना काहीअंशी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 20 कोटी लाभार्थ्यांना 1 मेपासून दोन महिने अतिरिक्त 5 किलो धान्य देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून (पीएमजेकेएवाय) सार्वजनिक वितरण प्रणालातून दोन महिने स्वस्त धान्य दुकानांना धान्य दिले जाणार आहे. ही योजना काही राज्यांनी आग्रह केल्याने पुन्हा वाढविण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर केली असताना केंद्र सरकारने गतवर्षी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली होती.
केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सचिव सुधांशु पांडे म्हणाले, की भारतीय अन्नधान्य महामंडळ (एफसीआय) देशातील 2 हजार गोदामांतून राज्यांना धान्य वितरित करणार आहे. त्यासाठी एफसीआय हे राज्यांच्या संपर्कात आहे. आम्ही एकत्रिपतणे एफसीआयकडून राज्यांना निश्चितच धान्य पुरवठा करणार आहोत.
हेही वाचा-कोव्हिशिल्डची किंमत बाजारपेठेत सर्वात कमी; सीरमकडून दराबाबत स्पष्टीकरण
धान्य वितरणासाठी 26,000 कोटी रुपयांचा खर्च येणार
येत्या दोन महिन्यांत 80 लाख टन धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी 26,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र, यावेळी धान्य वितरणात डाळींचा समावेश नसेल. मागील वेळ अपवादात्मक स्थितीत धान्यासोबत मोफत डाळींचे वितरण करण्यात आले होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएफएसए) सर्व डाळींचा समावेश होत असल्याचे पांडे यांनी सांगितले.