जळगाव- पुरेशा प्रमाणात गोदाम नसल्याने सीसीआयने ( कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी तीन आठवड्यांपासून थांबविली आहे. दुसरीकडे व्यापारी शेतकऱ्यांना कमी भाव देत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सीसीआय स्थानिक पातळीवर जिनिंग कारखानदारांशी करार करून त्यांच्याकडून भाडेतत्त्वावर जिनिंग करवून घेत असते. जिल्ह्यातील ५ ते ६ तालुक्यात सीसीआयने कापूस खरेदी केली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे.
जानेवारीपासून गुणवत्तेच्या निकषात सीसीआयने कापसाचे दर ५,५५० वरून ५,४५० प्रति क्विंटल केले आहेत. मात्र मार्च महिन्यात संपूर्णपणे खरेदी बंद करण्यात आली आहे. दरम्यान सीसीआयने कापूस खरेदी करावी, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.
हेही वाचा-'COVID 19'चा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही - अनुराग ठाकूर
सीसीआय बाजारपेठेचा आधार-
सीसीआयची कापूस खरेदी केंद्र हा शेतकऱ्यांचा एकमात्र आधार आहे. खासगी बाजारात ४,७०० ते ४,८०० रुपये प्रति क्विंटल कापूस खरेदी होत आहे. सीसीआयच्या केंद्रावर मात्र शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या कापसासाठी तब्बल ५४५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असल्याने सीसीआयच्या खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. यंदा विदर्भात प्रमाणावर कापूस खरेदी करणाऱ्या सीसीआयला कापूस गाठी साठवणूक करण्यासाठी पुरेसे गोदामे उपलब्ध नाहीत. शिवाय भाव कमी झाल्याने पडून असलेली सरकीची वेळेत विक्री करण्याचेदेखील मोठे आव्हान आहे.