नवी दिल्ली- चीनमधून देशात हवाला चॅनेलमार्गे वस्तू आयात होत असल्याची तक्रार अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयटी) सरकारकडे केली आहे. हा हवालाचा पैसा दहशतवादासाठी पाकिस्तानला पाठविण्यात येत असल्याचा संशय सीएआयटीने व्यक्त केला आहे. यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी सीएआयटीने केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारने लक्ष घातले तर कर लागू करण्यात आल्याने चिनी वस्तुही महाग होतील, असे सीएआयटीने म्हटले आहे.
चीनमधून देशातील बंदरामार्गे आयात होणाऱ्या वस्तुंची चौकशी करावी, असे सीएआयटीने म्हटले आहे. देशाची सुरक्षा आणि हितासाठी हवाला ऑपरेटरची उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही सीएआयटीने म्हटले आहे. देश दहशतवादाच्या समस्येला तोंड देत आहे. अशा स्थितीत दहशतवाद्यांना कोणीतरी आर्थिक मदत करत आहे, यात कोणताही संशय नाही. ही मदत चीनमधून देशात वस्तू आयात करून केली जाते. अशाप्रकारे चीन हा दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.