नवी दिल्ली – देशात कोणती उत्पादने ही अस्सल भारतीय आहेत की विदेशी हे समजणे कठीण जाते. ही परिस्थिती लक्षात घेवून अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याकरता पुढील टप्पा सुरू केला आहे. प्रत्येक उत्पादनांवर मूळ देशाचा उल्लेख करावा, अशी सीएआयटीने सरकारकडे मागणी केली आहे. हा नियम ऑनलाईन व ऑफलाईनसाठीही लागू करावा, असे व्यापारी संघटनेने म्हटले आहे.
देशात विकण्यात येणाऱ्या उत्पादनांवर किती प्रमाणात भारतीय उत्पादित घटकांचा वापर केला, याचा उल्लेखही करण्यात यावा, अशी मागणी सीएआयटीने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. जर उत्पादकांनी हे नियम पाळले नाही तर, त्यांना देशात उत्पादनांची विक्री करण्याची परवानगी देवू नये. नियमभंग झाल्यास उत्पादक, आयातदार आणि बाजारात विक्री करणाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे सीएआयटीचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी सरकारकडे मागणी केली आहे.