नवी दिल्ली- ऑनलाईन किरकोळ विक्रीच्या व्यवसायात अखिल भारतीय व्यापारी संघटननेने (सीएआयटी) पाऊल ठेवले आहे. संघटना ही उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) विभागाच्या मदतीने स्थानिक किरकोळ विक्रेते व किराणा दुकानांसाठी ई-कॉमर्स वेबसाईट सुरू केली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करताना अडथळ्यावर मात करण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट तयार करण्यात येत असल्याचे सीएआयटीने सांगितले. डीपीआयआयटी हा विभाग केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत आहे. व्यापारी संघटना विविध कंपनी आणि स्टार्टअपबरोबर पुरवठा साखळीसाठी काम करणार आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या लढ्याकरता देशभरात ५८७ टन वैद्यकीय साधनांचा पुरवठा
किराणा दुकानदारांना संपर्कविरहित ग्राहकांना घरपोच माल पोहोचविण्याची सेवा लवकरच लाँच होणार आहे. ही पूर्णपणे भारतीय ई-कॉमर्स वेबसाईट आहे. त्यामधून देशातील सात कोटी विक्रेत्यांना ऑनलाईन आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. उत्पादक, वितरक, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक यांचा ई-कॉमर्सचा सहभाग असणार असल्याचे सीएआयटीने सांगितले. सीएआयटीचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी अॅमेझॉन आणि वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टकडून अनुचित पद्धतीने व्यापार होत असल्याची सरकारकडे अनेकदा तक्रार केली होती.
हेही वाचा-देशात हायड्रोक्सीक्लोरोक्विनची कमतरता नाही :आयडीएमएम गुजरातचे चेअरमन
रिलायन्स इंडस्ट्रीजसह अॅमेझॉनही उतरली आहे स्पर्धेत-
रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओमार्ट-व्हॉट्सअॅपच्या भागीदारीतून किराणा दुकान आणि ग्राहकांना जोडणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. त्यानंतर अॅमेझॉनने लोकल शॉप्स ऑन अॅमेझॉन या कार्यक्रमांतर्गत स्थानिक दुकानदारांना ऑनलाईन विक्री सुविधा देण्याची घोषणा केली.