मुंबई - ग्राहकांना अनेक सेवा व्हॉट्सअॅपवरून मिळत असताना यामध्ये गॅस सिलिंडरचा नव्याने समावेश झाला आहे. ग्राहकांना भारत पेट्रोलियमचे गॅस सिलिंडर व्हॉट्सअॅपवरूनही बुकिंग करता येणार आहे.
भारत पेट्रोलियमचे गतवर्षी 71 दशलक्षहून अधिक ग्राहक होते. ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची ऑईल मार्केटिंग कंपनी आहे. भारत गॅसने आजपासून गॅस सिलिंडर बुकिंगसाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. त्यासाठी भारत पेट्रोलियमने ग्राहकांसाठी 1800224344 हा क्रमांक दिला आहे. ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच गॅस सिलिंडर बुक करता येणार आहे.
बीपीसीएलचे विपणन संचालक अरुण सिंह म्हणाले, की व्हॉट्सअॅपचा सर्वसामान्यपणे सर्वात अधिक वापर होतो. त्यामुळे व्हॉट्सअॅपमधून गॅस बुकिंग करणे अधिक सोपे होणार आहे.