हैदराबाद – कोरोनावरील लसीबाबत महत्त्वाची बातमी आहे. भारत बायोटेकने वॉशिंग्टनमधील युनिव्हर्सल स्कूल ऑफ मेडिसीनबरोबर चिंप एडेनोव्हायरस या एकवेळ नाकातून देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचा परवाना देण्यासाठी करार केला आहे.
भारत बायोटेक ही हैदराबादमधील लसनिर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीकडे अमेरिका, जपान आणि युरोपवगळता इतर देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक असलेल्या लसीच्या वितरणाचे अधिकार आहेत. कोरोनावरील लसीच्या चाचणीमधील पहिला टप्पा हा सेंट लूईस विद्यापीठाच्या लस आणि उपचार मूल्यांकन विभागात करण्यात येणार आहे. त्यानंतर भारत बायोटेककडून कोरोनावरील लसीची पुढील टप्प्यासाठी देशात चाचणी करण्यात येणार आहे. भारत बायोटेककडून कोरोनावरील लसीचे देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येणार आहे.
भारत बायोटेकचे संचालक आणि चेअरमन कृष्णा इल्ला म्हणाले, की विषाणुवरील लसीचा आमचा अनुभव, उत्पादन क्षमता आणि वितरण हे सुरक्षा, परिणामकारकता आणि परवडणाऱ्या दरातील लसीचा भाग आहे. अत्यंत गरजेची असलेली कोरोनाची लस जगभरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची भारत बायोटेकची जबाबदारी आहे. कंपनी 100 कोटीपर्यंत लसनिर्मितीची क्षमता वाढविणार आहे. त्यामुळे तेवढ्याच लोकांना लसीचा एक डोस मिळणे शक्य होणार आहे. नाकातून लस देणे हे प्रशासकीयदृष्ट्या सोपे नसते. तसेच नीडल, सिरींज अशा गोष्टींचा वापरही कमी लागतो. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेचा खर्च वाचतो, असेही इल्ला यांनी सांगितले.
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन आणि प्रेसिजन व्हायरोलजीचे हंगामी सीईओ डॉ. डेव्हीड टी कुरियल म्हणाले, की नाकातून देण्यात येणारी लस ही परिणामकारक प्रतिकारक्षमता असलेली असणार आहे. ही लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, पुण्याची सिरम ही कोरोनाच्या लसीच्या निर्मितीसाठी स्पर्धेत आहे. भारतामधून कोरोनावरील लसीचे उत्पादन कमी दरात होऊ शकते, असा जगभरातील अनेक देशांना विश्वास आहे.