सॅनफ्रान्सिस्को- घटस्फोट झाल्यानंतर तिला मिळाले आहेत, तब्बल २ लाख ६६ हजार कोटी! ही रक्कम एवढी आहे की ती एका क्षणातच जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे. ती महिला म्हणजे अॅमेझॉनचा सहसंस्थापक जेफ बेझोसची पूर्वाश्रमीची पत्नी मॅकेन्झी. न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाचे प्रकरण शुक्रवारी मंजूर केले आहे.
वॉशिंग्टनमधील न्यायालयाने शुक्रवारी बेझोस दाम्पत्याचे घटस्फोटाचे प्रकरण मंजूर केले आहे. यामध्ये अॅमेझॉनचे ४ टक्के शेअर हे मॅकेन्झीला देण्याची तडजोड करण्यात आली आहे. याची किंमत ३८ अब्ज डॉलर आहे.
जेफ यांच्याकडे अॅमेझॉनचे ११४.८ अब्ज डॉलर शेअर आहेत. तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. बेझोस दाम्पत्याने एप्रिलमध्ये घटस्फोटाचा अंतिम निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतर एखाद्या पत्नीला मिळणारी ही रक्कम आजपर्यंतची जगात सर्वात अधिक आहे.
मॅकेन्झी या ४९ वर्षे वयाच्या लेखिका आहेत. त्यांनी यापूर्वीच मिळणाऱ्या रक्कमेतील अर्धी रक्कम समाजसेवेसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे. ही रक्कम जगप्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरेन बफेट यांच्या गिव्हिंग प्लेजला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. दान करण्यासाठी भरपूर संपत्ती असल्याचेही त्यांनी म्हटले होते.