बंगळुरू - ऑनलाईन खरेदी करताना बंगळुरुमधील महिलेची फसवणूक झाली आहे. एका बोगस ई-कॉमर्स अॅपवरून महिलेने ऑनलाईन आर्थिक व्यवहार केला. यामध्ये महिलेची 80 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. श्रावण्णा असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.
फसवणूक झालेली श्रावण्णा ही महिला दक्षिण बंगळुरूमधील रहिवासी आहे. तिने कोनानकुंटे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या महिलेने 800 रुपयाच्या कुडत्याची एका ऑनलाईन अॅपवरून 8 नोव्हेंबरला खरेदी केली. एक दिवस होवूनही कुडता घरपोहोच न आल्याने महिलेने अॅपवरील ग्राहक सेवेशी संपर्क केला. त्यावेळी महिलेला घरी कुडता पाठवू, असे सांगण्यात आले. त्यापूर्वी एक फॉर्म भरण्याची सूचनाही करण्यात आली.
ऑनलाईन फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीनुसार महिलेने बँकेबाबतची सविस्तर माहिती दिली. कुडता घर पोहोच पाठविण्यासाठी ओटीपीचा क्रमांक सांगण्याची ग्राहक सेवेच्या क्रमांकावरून त्यांना दुसऱ्या दिवशी विनंती केली. त्यावेळी आपण फसवणुकीच्या जाळ्यात सापडलो आहोत, याचा पुसटसाही त्यांना अंदाज आला नाही. ओटीपी देताच काही वेळानंतर त्यांच्या खात्यावरून 79 हजार 600 रुपये चार टप्प्यात काढून घेण्यात आले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांच्या माहितीनुसार भामट्यांनी महिलेचा विश्वास संपादन करून फसवणूक केली आहे. ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क साधूनही काहीच फायदा झाला नाही.
ऑनलाईन खरेदी करताना, घ्या दक्षता-
गुगल प्ले स्टोअर व अॅपलच्या आयओएसवरील सर्व अॅप विश्वसनीय नाहीत, हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे सायबरतज्ज्ञांचे मत आहे. काही अॅपमधून सहजपणे फसवणूक होवू शकते. कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी ते सुरक्षित असल्याची खात्री करणे गरजेचे आहे.