नवी दिल्ली - एसबीआयसह इतर बँका कर्जवसुलीसाठी फरार उद्योगपती विजय मल्ल्या याची स्थावर मालमत्ता आणि रोखे विकू शकतात, अशी विशेष न्यायालयाने आज परवानगी दिली आहे. मल्ल्याची ईडीने जप्त केलेली मालमत्ता द्यावी, अशी एसबीआयसह ११ बँकांनी विशेष पीएमएलए न्यायालयाला विनंती केली होती. त्यावर विशेष न्यायालयाने या बँकांना दिलासा दिला आहे.
मुंबईमधील विशेष पीएमएलए न्यायालयाने विजय मल्ल्याची 5,646.54 कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याची बँकांना परवानगी दिली आहे. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार एसएआरएफएईएसआय कायदा 2002 नुसार बंँकांकडून कर्जवसुलीची प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये मालमत्तेचा लिलाव व विक्री ही मार्गदर्शक सूचनांप्रमाणे होणार आहे.
हेही वाचा-चीनची हुवाई अमेरिकेच्या गुगलला देणार टक्कर; स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टिम लाँच
अशी झाली बँकांची फसवणूक
एसबीआयचे 6,900 कोटी रुपये किंगफिशर एअरलाईन्सने बुडविले आहेत. तर पंजाबन नॅशनल बँकेचे 800 कोटी, आयडीबीआय बँकेचे 800 कोटी, बँक ऑफ इंडियाचे 650 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाचे 550 कोटी रुपये आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 410 कोटी रुपये बुडविले आहेत. मल्ल्या हा 9,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगसह फसणुकीत गुंतल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे.