नवी दिल्ली - बँकेच्या ग्राहकांकरता महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल ट्रेड युनियनच्या एकदिवसीय संपात बँक कर्मचारी संघटना उद्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे देशभरातील बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सेंट्रल ट्रेड युनियनने नवीन तीन कामगार कायद्याविरोधात गुरुवारी संप पुकारला आहे. बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आयडीबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्राने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफसर्स असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) या संघटना संपात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा-'लक्ष्मी विलास'चे-डीबीएस बँकेत २७ नोव्हेंबरला होणार विलिनीकरण -आरबीआय
नवीन कायद्यामुळे कामगारांना कायदेशीर संरक्षण मिळणार नाही-
लोकसभेच्या मान्सून अधिवेशनात तीन कामगार कायदे मंजूर केले आहेत. उद्योजकतेच्या नावाखाली कॉर्पोरेटच्या हितासाठी २७ कायदे रद्द करून तीन कायदे लागू केले आहेत. या मंजुरीमुळे ७५ टक्के कामगार हे कामगार कायद्याच्या कक्षेतून बाहेर पडणार आहेत. त्यांना नवीन कायद्यामुळे कायदेशीर संरक्षण मिळू शकणार नसल्यचा एआयबीईएने म्हटले आहे.
हेही वाचा-शेअर बाजारात ६९५ अंशाने पडझड; गुंतवणूकदारांनी गमाविले २.२४ लाख कोटी रुपये!
एआयबीईए ही संघटना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक वगळता सर्व बँकांच्या संघटनांचे प्रतिनिधीत्व करते. या संघटनेत विविध सार्वजनिक आणि खासगी बँकांमधील ४ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच काही विदेशी बँकांचाही समावेश आहे.
कामकाज सुरळित ठेवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राकडून काळजी-
बँकांच्या शाखा आणि कार्यालयामधील नियमित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकांकडून आवश्यक ती पावले उचलण्यात येत असल्याची माहिती बँक ऑफ महाराष्ट्राने शेअर बाजाराला दिली आहे.