व्हिएन्ना- शेतीत वापरले जाणारे ग्लायफॉसेट तणनाशक हे कर्करोगाला निमंत्रण ठरत असल्याचा आरोप आहे. याची गंभीर दखल घेत ऑस्ट्रियातील संसदेत ग्लायफॉसेटवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रिया हा वादग्रस्त तणनाशकावर बंदी घातलेला युरोपीय युनियनमधील पहिला देश ठरला आहे.
ऑस्ट्रियामध्ये सामाजिक लोकशाही पक्षाने ग्लायफॉसेटवरील बंदीचे विधेयक सादर केले. त्याच्या वापराने कर्करोग होत असल्याचा संशय आहे. कर्करोगाबाबत पूर्व सावधगिरी म्हणून तणनाशकावर बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकेच्या मॉनसँटो कंपनीकडून ग्लायफॉसेट उत्पादनाचे जगभरात विपणन (मार्केटिंग) केले जाते. हे उत्पादन जर्मनीच्या बायर कंपनीने अमेरिकेच्या राऊंडअप कंपनीकडून 2018 मध्ये विकत घेतले आहे. यानंतर बायर कंपनीवर टीका झाली होती. ग्लायफॉसेटच्या परवान्याचे नुतनीकरण करताना पारदर्शीपणा ठेवण्यात येईल, असे कंपनीने आश्वासन दिले होते. असे असले तरी बायरच्या उत्पादनामध्ये ग्लायफॉसेटचे पूर्वीप्रमाणे महत्त्वाचे स्थान असेल, असे कंपनीने म्हटले आहे.