नवी दिल्ली - पुलवामाच्या दहशतवादांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा 'मोस्ट फेव्हर्ड नेशन' (एमएफएन) हा दर्जा काढून घेतला आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केल्याने पाकिस्तानला त्याची आर्थिक किंमतही चुकवावी लागणार आहे.
गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ४५ जवानांना वीरमरण आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षा समितीची आज सकाळी तातडीची बैठक घेण्यात आली. यामध्ये पाकिस्तानला देण्यात आलेला 'मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
काय आहे मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा-
जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमाप्रमाणे एमएफएनचा भारताने पाकिस्तानला दर्जा दिला होता. या दर्जाप्रमाणे संबंधित देशाशी व्यापार करताना कोणताही भेदभाव करता येत नाही. याचाच अर्थ कोणत्याही देशासाठी जास्त अथवा कमी कर लागू करून विशिष्ट वागणूक देता येत नाही.
पाकिस्तानकडून मात्र भारताला एमएफएनचा दर्जा देण्यास टाळाटाळ -
भारताने पाकिस्तानला १९९६ मध्ये मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा दिला आहे. त्याला प्रतिसाद म्हणून पाकिस्तानने २ नोव्हेंबर २०११ मध्ये घेतलेल्या निर्णयाची अजुनही अंमलबजावणी केलेली नाही. पाकिस्तानने भारताला अद्याप मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा दिला नाही. मात्र, त्याऐवजी मार्च २०१२ मध्ये 'पॉझिटिव्ह लिस्ट'मध्ये भारतामधून आयात होणाऱ्या काही वस्तुंचा समावेश केला. यापूर्वी पाकिस्तानने भारतामधून आयात होऊ न शरणाऱ्या वस्तुंची 'नेगेटिव्ह लिस्ट' तयार केली होती.