नवी दिल्ली- अपोलो हॉस्पिटल्स आणि डॉ. रेड्डीज लॅबोरटरीजने लसीकरण मोहिमेसाठी स्पूटनिक व्हीबरोबर भागीदारी केली आहे. लसीकरण मोहिम लाँच झाल्यानंतर स्पूटनिक व्ही लशीची किंमत अपोलो रुग्णालयात १ हजार ते १२५० रुपये असेल, अशी माहिती रेड्डीज लॅबोरटरीजने दिली आहे.
अपोलो हॉस्पिटल्स आणि डॉ. रेड्डीज लॅबोरटरीज यांनी कोरोना लसीकरण कार्यक्रमासाठी स्पूटनिक व्हीबरोबर करार केला आहे. पहिल्या टप्प्यात हैदराबादमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. तर १८ मे रोजी विशाखापट्टणम येथील रुग्णालयात लसीकरण घेण्यात आले. या लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी आणि केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
हेही वाचा-संपूर्ण देशात लसीकरण होण्याकरिता दोन-तीन वर्षे लागणार-अदर पुनावाला
स्पूटनिक लशीच्या सॉफ्ट लाँचिंगनंतर डॉ. रेड्डीज लॅबोरटरीजचे सीईओ एम. व्ही रमणा म्हणाले, की स्पूटनिक लशीच्या डोसची किंमत १ हजार ते १२५० रुपये असणार आहे.
स्पूटनिक व्ही देशातील पहिली कोरोना लस-
देशामध्ये स्पूटनिक व्ही लशीची आयात केलेली पहिली बॅच नुकतीच दाखल झाली आहे. हैदराबाद, विशाखापट्टणमनंतर दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुण्यामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. रशियाच्या संस्थेने ऑगस्ट २०२० मध्ये तयार केलेली स्पूटनिक व्ही ही जगातील पहिली कोरोना लस आहे.
हेही वाचा-चांदी महागली! दोन दिवसांत प्रति किलो ३ हजारांनी वाढले दर
कोविनमधील माहितीनुसार हैदराबादमध्ये अपोलो हॉस्पिटल्समध्ये स्पूटनिक लशीची किंमत प्रति डोससाठी १,२५० रुपये असणार आहे.
लशीचे उत्पादन वाढल्यास किंमत कमी होणार-
लशीचे देशात उत्पादन वाढल्यानंतर किंमत कमी होईल, असे रमणा यांनी सांगितले. भारतात स्पूटनिक व्हीचे उत्पादन घेतल्यानंतर येत्या दोन-तीन महिन्यात लशीची किंमत ठरविण्याच्या स्थितीत आपण असणार आहोत. लशीचे उत्पादन सुरू करण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी वेळ लागणार आहे.
डॉ. रेड्डीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार आयात केलेल्या स्पूटनिक व्ही लशीची किंमत ९४८ रुपये असणार आहे. तर ५ टक्के जीएसटीनंतर या डोसची किंमत ९९५.४ रुपये असणार आहे.