नवी दिल्ली- सणाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी होते. ही लक्षात घेवून ई-कॉमर्स कंपन्यांनी आणलेल्या बंपर सेलला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने फक्त सहा दिवसातच १९ हजार कोटींच्या वस्तूंची विक्री केली आहे. हा व्यवसाय २९ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान झाल्याचे एका संशोधन संस्थेने म्हटले आहे.
सहा दिवसाच्या ऑनलाईन सेलमध्ये वॉलमार्टची मालकी असलेले फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यांचा ९० टक्के हिस्सा राहिला आहे. ही माहिती बंगळुरुच्या रेडसीर कन्सल्टन्सी संशोधन संस्थेने दिली आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन कंपन्यांकडून ३९ हजार कोटींची उलाढाल होईल, असेही संशोधन संस्थेने म्हटले आहे.
आव्हानात्मक वातावरण असतानाही ऑनलाईन खरेदी करण्यासाठी उपभोक्ते उत्सुक आहेत, असे रेडसीरचे संस्थापक अनिल कुमार यांनी सांगितले. ई-कॉमर्स कंपन्यांच्या एकूण वस्तू विक्रीपैकी सर्वात जास्त मोबाईलची ५५ टक्के विक्री झाली आहे. श्रेणी २ आणि श्रेणी ३ शहरांतील ग्राहकांकडून ऑनलाईन खरेदीचे लक्षणीय प्रमाण वाढल्याचेही संशोधन संस्थेने म्हटले आहे.
फ्लिपकार्टच्या सणादरम्यानच्या व्यवसायात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्के वाढ झाली आहे. तर अॅमेझॉनच्या सणादरम्यानच्या व्यवसायात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २२ टक्के वाढ झाली आहे. ऑनलाईन वस्तू विक्रीत फ्लिपकार्टचा एकूण ६० ते ६२ टक्के तर अॅमेझॉनचा सुमारे ३० टक्के हिस्सा राहिला आहे. विशेष म्हणजे फ्लिपकार्टवरील एकूण विक्रेत्यांपैकी ५० टक्के विक्रेत्यांच्या व्यवसायात तिप्पटीने वाढ झाली आहे.
दरम्यान, मंदावलेली अर्थव्यवस्था असल्याने मागणी कमी झाल्याचे बाजारपेठेत चित्र होते. ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायामुळे ग्राहकांची मागणी वाढल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.