नवी दिल्ली – सरकारी मालकी असलेल्या एअर इंडियाचे केंद्र सरकार खासगीकरण करणार आहे. असे असले तरी सरकारने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सहा महिने ते पाच वर्षापर्यंत विनावेतन सुट्टी देण्याची योजना जाहीर केली आहे.
एअर इंडिया कर्मचाऱ्यांना देणार पाच वर्षांपर्यत विनावेतन सुट्टी
कार्यक्षमता, कामगिरी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य आदी निकषावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना विनावेतन सुट्टी देण्यात येणार आहे.
एअर इंडियाचे व्यवस्थापन हे काही निकषावरून कोणत्याही कर्मचाऱ्याला विनावेतन सुट्टीवर पाठवू शकणार आहे. एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की संचालकांची 102 वी बैठक 7 जुलै 2020 झाली आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांना सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत विनावेतन सुट्टी देण्याची योजना मंजूर करण्यात आली. या कालावधीमध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांना पाच वर्षापर्यंत विनावेतन सुट्टी देण्याचीही तरतूद आहे. या योजनेला कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनीही परवानगी दिली आहे. मात्र, कार्यक्षमता, कामगिरी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य आदी निकषावर कर्मचाऱ्यांना विनावेतन सुट्टी देण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांची माहिती सरव्यवस्थापक व मुख्य कार्यालयाची नोटीस व्यवस्थापनाने सर्व विभागांना दिली आहे.
दरम्यान, टाळेबंदीच्या काळात विमानसेवा बंद पडल्यामुळे एअर इंडिया आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे वैमानिकांचे पगार वेळेवर करणे कंपनीला शक्य झाले नाही. अनेक वैमानिकांचे पगार प्रलंबित आहेत. ही प्रलंबित थकबाकी तातडीने फेडण्याची मागणी एअर इंडिया पायलट्स असोसिएशनने नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच केली आहे.